-
サマリー
あらすじ・解説
आज मराठी राजभाषा गौरव दिन... कवी कुसुमाग्रज यांची जयंती
विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती
म्हणुन नव्हती भीती तिजला पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली
म्हणुन नाही खंतही तिजला मरावयाची
- कुसुमाग्रज
या चार ओळींत काय नाही?
कवीचा आपल्या कवितेवरचा, शब्दांवरचा, भाषेवरचा आणि त्यामधून मिळणार्या स्वानंदावरचा विश्वास तर आहेच... पण त्याहीपुढे जाऊन रोजच्या जगण्यात आपल्याला जखडून टाकणार्या कुंपणांना भेदणारी गुरुकिल्लीही आहे.
लोक काय म्हणतील? माझं हसं झालं तर काय होईल? प्रयत्न करुनही मी अपयशी ठरलो तर? चार लोकांसमोर मला नीट बोलता आलं नाही तर? अशा अनेक प्रश्नांमुळे, अविवेकी समजांमुळे आपण भीती, नैराश्य, लाजाळूपणा, भिडस्तपणा आणि आत्मविश्वासाच्या अभावाला जवळ करतो.
या चार ओळींमधला अर्थ समजून घेतला तर या भावनांना दूर करणे सहज शक्य होते. कुणावर विजय मिळवायचा, कुणासमोर आपली क्षमता सिध्द करायची, अमक्याने बरोबर म्हणले तरच आपण चांगले, चार लोकांना / समाजाला जे मान्य असते तेच योग्य... अशा अविवेकी विचारांनी आपल्या क्षमतांना आपण जखडून टाकतो, कुंपणं घालतो आणि इतरांनी चांगलं म्हणण्याची वाट बघत बसतो.
जगात रत्नपारखी कमी आहेत... अस्सल हिरा अज्ञानी माणसाच्या हातात पडला तर तो त्याला दगडच वाटतो, म्हणून तो हिरा नसतो का? आपण काय आहोत ते आपल्यालाच समजत नसेल तर इतरांना आपली खरी ओळख कशी होणार? इकिगाई मधूनही हेच तर सांगीतले होते... स्वत:ला समजून घ्या, आपला प्रवास आपला मार्ग आपला वेग आपली पध्दत इतरांपेक्षा वेगळी आहे हे लवकरात लवकर डोक्यात जाऊ दे. मग इतरांबरोबर आपली नाहक तुलना करणे बंद होते आणि स्वानंदाचे दार खुले होते.